महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । सोन्याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे आणि त्यामुळे सोन्याशी संबंधित साठा आणि दागिन्यांच्या साठ्यात हालचाल झाली आहे. वास्तविक, वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्क कमी करून 4 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जाते आणि त्यावर 2.5 टक्के कृषी उपकर किंवा कर आकारला जातो, त्यामुळे एकूण आयात शुल्क 10 टक्के आहे. मार्च 2022 पर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण त्यामुळे होण्याची शक्यता आहे.
सोन्याचे आयात शुल्क कमी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती आणि आता वाणिज्य मंत्रालयाने या मागणीला पुन्हा बळ दिले आहे.भारत हा सोन्याची आयात करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे आणि यावर्षी 900 टन सोन्याची आयात करण्यात आली आहे, जी 6 वर्षांतील सर्वाधिक आहे. अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 12 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांवर आणले आणि त्याचे उद्योग जगताने स्वागत केले.
सरकारने वाणिज्य मंत्रालयाच्या शिफारशी मान्य केल्यास त्याचा थेट परिणाम सोन्याची तस्करी कमी होण्याच्या रूपात दिसून येईल. अनधिकृत आकडेवारीनुसार, भारतात अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात सोन्याची आवक होत आहे आणि त्यामुळे सरकारला आयात शुल्काचा तोटा सहन करावा लागतो.
या वर्षी 900 टन सोने आयात करण्यात आले असले तरी अहवालानुसार एकूण सोन्यापैकी 25 टक्के सोने अवैधरित्या देशात आले असून सुमारे 200 ते 250 टन सोने तस्करी व अवैध मार्गाने देशात आले आहे.