महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी विराट कोहलीने (Virat Kohli vs Sourav Ganguly Controversy) घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे भारतीय क्रिकेटमध्ये नवं वादळ निर्माण झालं. वनडे कॅप्टन्सी गमावल्यानंतर विराट कोहली नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. एवढच नाही तर विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात वाद असल्याचंही बोललं गेलं. विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र वाद विराट आणि रोहित यांच्यात नसून विराट आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात असल्याचं जाणवलं. सौरव गांगुलीने केलेला दावा विराट कोहलीने खोडून काढला.
विराट कोहलीने गांगुलीलाच खोटं ठरवल्यानंतर आता खुद्द सौरव गांगुलीनेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता या गोष्टी आणखी पुढे न्यायला नकोत. मला यावर काहीच बोलायचं नाही. हे प्रकरण बीसीसीआयचं आहे आणि आता बोर्डच हे प्रकरण बघून घेईल, असं सौरव गांगुली म्हणाला आहे.
काय झाला वाद?
विराटची वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर सौरव गांगुलीला याबाबत विचारण्यात आलं होतं. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं पण त्याने नकार दिला. यानंतर निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार असला पाहिजे असं वाटलं, ज्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं गांगुलीने सांगितलं. गांगुलीने केलेला हाच दावा विराट कोहलीने पत्रकार परिषदेत फेटाळून लावला.
‘टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं मला सांगण्यात आलं नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी निवड समितीने आता तू वनडे टीमचा कॅप्टन नसशील असं सांगितलं,’ अशी प्रतिक्रिया विराटने दिली.