महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । मुळशीमधील आधुनिक पद्धतीने शेती करणारे ज्ञानेश्वर बोडखे यांनी केवळ एक एकर शेतात तब्बल शंभर प्रकारच्या विविध रोप लावून सेंद्रिय पद्धतीने शेती (Organic farming) करून शेतकऱ्यांना एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मुळशी (Mulshi) तालुक्यातील मान गावाचे ज्ञानेश्वर बोडखे. जेमतेम दहावी शिकलेले यांच्याकडे केवळ एक एकर शेती आहे. परंतु त्यात तब्बल शंभर प्रकारच्या भारतीय भाज्या, फळे, विदेशी भाज्या पिकवल्या जात आहेत. तेही सेंद्रिय पद्धतीने. शेतामध्ये केवळ एकच एक पीक घेऊन त्यात नफा मिळवता हे परवडणारे नव्हतं. लहान लहान मुलं, त्यांची शिक्षण त्याचप्रमाणे संसाराचा गाडा ओढणे त्यांना जमले नाही, त्यामुळे काय करावे हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांच्या पुढे होता. मग त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करत करत मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यानंतर शेतीत वडिलांना मदत करण्याच्या हेतूने मुलीने बीएससी अॅग्री करण्याचा निर्णय घेतला आणि तिला यशही आले. भावाची उत्तम साथ तिला मिळाली आणि बघता बघता एक एकर क्षेत्रात सुमारे शंभरच्या वर भाज्या आणि फळे पिकू लागली. मुलगी बीएससी झाल्यानंतर मुलाने देखील इंजिनिअरिंग केले. त्यानुसार आता काही वेगळ्या पद्धती म्हणजे आधुनिक पद्धत वापरून ही सेंद्रीय शेती केली.
शहरात मॉलमध्ये विदेशी भाज्याची जास्त प्रमाणात मागणी असल्याचे ज्ञानेश्वर बोडके यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विदेशी भाज्या पिकवायला सुरुवात केली. लेतुस, बेसिल, ब्रोकोली, चेरी टोमॅटो अशा विविध पंचवीस प्रकारची फळे, भाज्या यांचे पीक घेतले. भाज्यांचे विविध प्रकार असल्यामुळे एका भाजीला भाव मिळाला नाही तर दुसऱ्या चार भाज्यांना भाव मिळतो त्यामुळे तोटा हा होतच नाही. त्याचप्रमाणे शेतीला जोडधंदा म्हणून गायींचे दूध, शेणखत, बायोगॅस असे वापरून त्यातून देखील उत्पन्न सुरू असल्याने तोटा होतच नाही. शिवाय मजुरांची कमी सतत भासत असल्याने सर्व घरातील मंडळीच काम करतात. त्यामुळे त्याचा खर्च देखील वाचला जात असल्याचे ज्ञानेश्वर बोडके यांनी त्यांच्या यशाचे गमक सांगितले.
एक मिरचीचे झाड चार लोकांच्या कुटुंबाला वर्षभर मिरची खायला देतं. एका चार लोकांना चार ते पाच मिरची दिवसाला लागते जास्त नाही. दरम्यान प्रत्येक ठिकाणी आपण शेतीतील माल पोहचू शकत नाही म्हणून महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी माल पोहचवला यात महिलांना रोजगारही मिळाला.