महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; पुणे :पुणे व पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयांत 57 जण दाखल असून, त्यापैकी 15 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तर उरलेले 42 रुग्ण संशयित आहेत. पिंपरी – चिंचवडमध्ये शनिवारी आढळलेल्या पाच पैकी चार रुग्ण हे एका पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक आहेत. त्यापासून चौघांना संसर्ग झाला आहे; तर पाचवा रुग्ण थायलंडला सहलीसाठी जाउन आला होता, तेथेच त्याला संसर्ग झाला. त्याच्यासोबत आणखी 93 जण होते. त्या सर्वांचे संपर्क प्राप्त झाले असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे, प्रशानाकडून कोरोनासाठी करण्यात येणार्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कठोर करण्यात येणार असल्याचे सुतोवाच डॉ. म्हैसेकर यांनीकेले आहे.पिंपरी चिंचवडमध्ये जे नवीन पाच रुग्ण आढळून आले, त्यापैकी चार जण हे सध्या दाखल असलेल्या कोरोना (कोविड-19) पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना संसर्ग होत असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून गरज पडल्यास पुण्यात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात येईल, अशी शक्यता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली. रात्री उशिरा याबाबत निर्णय होणार आहे.
आतापर्यंत पुणे व पिंपरी चिंचवडमधून 315 संशयितांचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ ला पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 294 रुग्णांचे नमुने प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 15 रुग्ण पॉझिटिव्ह तर उरलेले 278 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आढळले आहेत, तर, 21 रुग्णांचे नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. परदेशातून आलेल्या 430 रुग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
रुग्णांबाबत भेदभाव नको
जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना हौसिंग सोसायट्यातील सदस्यांकडून भेदभाव केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. इथून पुढे अशा तक्रारी आल्यास सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना पदमुक्त करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.
मॉलमधून तीन दुकाने वगळली.मॉल बंद करण्यात आले असले तरी त्यामधील औषधे, किराणा माल आणि भाजीपाला ही दुकाने त्यातून वगळण्यात आली आहेत. त्याव्यतिरिक्त सर्व शॉप बंद करण्यात आले आहेत.
होस्टेल सोडण्यास सक्ती करू नका .शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत; परंतु, शाळा व महाविद्यालयांनी तेथे निवासी असलेल्या विद्यार्थ्यांना होस्टेल सोडण्याची सक्ती करू नये. विद्यार्थ्यांना होस्टेलला राहायचे असेल, किंवा त्यांच्या परीक्षा सुरू असतील, तर त्यांना होस्टेल सोडण्यास सांगू नये, असेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.