महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाहांच्या दौऱ्याची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन आणि आरतीनं होणार आहे. तसेच पुणे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.
अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली होती. पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपू्र्ण परिसर उजळून निघाला आहे. अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजनही अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत भाजप बूथ कार्यकर्ता संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल (शनिवारी) ते अहमदनगरमध्ये होते. प्रवरानगर येथे राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा नियोजित करण्यात आला होता. मात्र, तो अचानक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता 18 आणि 19 डिसेंबर असे दोन दिवस ते नगर आणि पुणे जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.