महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । बंगळूर येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ( शिवपुतळा विटंबना ) केली. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. घटनेच्या निषेधार्थ आक्रमक शिवसैनिकांनी पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करीत कर्नाटकात जाणार्या वाहनांना काळे फासले. काही वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहीत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
कोल्हापुरात शनिवारी सकाळी 11 वाजता शिवसैनिक तावडे हॉटेल येथे जमले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कर्नाटक सरकारचा धिक्कार असो’, ‘कानडी गुंडांचा निषेध असो’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. कर्नाटक व केंद्रात भाजप सरकारचे राज्य आहे. ( शिवपुतळा विटंबना )
ज्यांनी विटंबना करण्याचे विकृत कृत्य केले आहे, त्यांना तत्काळ शोधून काढा, अन्यथा बंगळूरमध्ये जाऊन त्याला शोधून ठेचून काढू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन थोड्या वेळाने सोडून दिले. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, राजेंद्र पाटील, राजू यादव, युवा सेनेचे मंजित माने, महिला आघाडीच्या स्मिता सावंत, भाग्यश्री देशपांडे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी चौकात विविध संघटनांसह सर्वपक्षीयांतर्फे या घटनेचा धिक्कार करण्यात आला. विटंबना करणार्या समाजकंटकांना कर्नाटक सरकारने लवकर अटक करावी, अन्यथा कोल्हापूर बंद ठेवत येथील कन्नडिगांना हाकलून लावण्याचा इशारा देण्यात आला.
बंगळूरमधील सदाशिवनगरात असणार्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. बेळगावमध्ये शुक्रवारी सायंकाळपासून याचे पडसाद उमटले. रात्री कोल्हापुरातही काही संघटनांनी छत्रपती शिवाजी चौकात जमून या घटनेचा निषेध केला. शहरातील काही कानडी व्यावसायिकांना दुकानेही बंद करण्यास भाग पाडले.
शनिवारी दुपारी 12 वाजता सर्वपक्षीयांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात बंगळूरमधील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ‘कानडी गुंडांचा धिक्कार असो’, ‘समाजकंटकांना अटक झालीच पाहिजे’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कर्नाटक सरकारने या घटनेतील समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच असे प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा कोल्हापूर बंद ठेवत येथील कानडी व्यावसायिकांना हाकलून लावण्याचा इशारा दिला.