महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । नाशिक । टपाल विभागाने पोस्टमन, डाकसेवकांच्या माध्यमातून विभागातील टपाल कार्यालयात UIDAI च्या CELC ॲपद्वारे नागरिकांना आधाकार्डला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा डाक विभागामार्फत माहिती अद्ययावत करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
विभागातील डाक कार्यालयात ही सुविधा उपलब्ध असून, या सेवेमुळे नागरिकांना आधारकार्डला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी लिंक करता येणार आहे.
नाशिक विभागातील सर्व नागरिकांनी तसेच मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी सर्व रहिवाशांसाठी तसेच मोठ्या आस्थापना किंवा कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस अद्ययावत माहिती लिंक करण्याकरिता जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधून सोय करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारने भारतीय डाक विभागाची बँकिंग सेवा असून, त्याद्वारे धन हस्तांतरण (मनी ट्रांसफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस या सुविधांच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडले असेल तर आधार सक्षम पेमेंट सिस्टम (Aeps) सेवेद्वारे बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे.
नागरिकांना आधार मोबाईल लिंक करण्यासाठी आयपीपीबीच्या www.ippbonline.com या संकेतस्थळावरुन लिंक करता येणार आहे.
– मोहन अहिरराव, प्रवर अधीक्षक नाशिक