महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर वायव्य भारतातून थंडीची हुडहुडी भरू लागली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात तीव्र थंडीची लाट (Severe cold wave) धडकली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण (Temperature drop in maharashtra) झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे.
त्यानंतर मात्र महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 21 डिसेंबरनंतर देशात पुन्हा एकदा 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वायव्य भारतात सकाळी आणि सायंकाळी तापमान सरासरी तापमानापेक्षा खाली घसरत आहेत. त्यामुळे राजस्थानात थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत. तर दिल्लीत येलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत दिल्लीतील तापमान 4 ते 5 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. पुण्यातील शिरूर याठिकाणी आज सकाळी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली आणि पाषण या दोन्ही ठिकाणचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. दुसरीकडे विदर्भात देखील गारठा वाढला असून नागपुरातील वातावरण 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार आहे. पण त्यानंतर 21 डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.