महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पुण्यात येऊन राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. ‘हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करावे’ असे आव्हान अमित शहांनी दिले होते. तसेच हिंदुत्त्वावरुनही त्यांनी शिवेनेला डिवचले होते. आता यावर सोमवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. पुण्यात येत आम्हाला शिकवू नका अशा शब्दात खडेबोल सुनावले आहे.
जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू
रविवारी अमित शहा हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हिंदुत्त्वावरुन निशाणा साधला होता. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्त्व सोडले असल्याचे शहा म्हणाले होते. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना भाजप आणि गृहमंत्री शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘पुण्यात येत आम्हाला शिकवू नका. महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी आहे. येथे खोटे बोलण्याचे पातक करु नका. तसेच अमित शहांनी पुण्यात रविवारी जे काही वक्तव्य केली आहेत ते पूर्ण असत्य आहे. ते नक्की खरं काय बोलले याचा आम्ही शोध घेतोय. आमच्या सरकारविषयी आणि हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.
शिवसेनेशिवाय भाजपला 105 जागा अशक्य
हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मैदानात यावे असे आव्हान अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले होते. यावर राऊतांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय भाजपला 105 जागा अशक्य आहे. तसेच वाढत्या इंधन किमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. इंधनाचे दर दहा रुपयांनी वाढवायचे आणि चार रुपयांनी कमी करायचे हे सरकारला शोभत नाही. तसेच ईडी, सीबीआय हे भाजपचे चिलखत आहे. पण यामुळे आम्हाला कोणताही फरक पडत नाही असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
…गहमंत्र्यांना देशात काम नसेल तर आम्हाला सांगावे
राऊतांनी अमित शहांवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले की, ‘सत्तेच्या वाटपाचा अर्थ काय होतो, हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगणेच नको. सत्तेच्या वाटपाच्या वेळी मुख्यमंत्री पद देखील होती. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या पुण्यामध्ये तुम्ही खोटे बोलू नका. गृहमंत्र्यांना देशात कामे नसतील तर आम्हाला सांगावे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. तुमच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात येऊन तुम्हाला आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा आणि आम्ही आमच्या मर्यादेत राहतो’ असे म्हणत राऊतांनी शहांना प्रत्युत्तर दिले आहे.