महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी जौनपूरमध्ये एकूण १,१२३ कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पुढच्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांसारखे बनवले जातील, असं या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी सोमवारी जौनपूर जिल्ह्यातील मच्छलीशहर येथील फौजदार इंटर कॉलेजमध्ये लोकांना संबोधित करताना म्हणाले, माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. येत्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचे रस्ते युरोपीयन नाही तर अमेरिकेसारखे होतील.
यावेळी ते म्हणाले, “मी शेतकरी आहे, मी माझे आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केले आहे, माझ्या परिसरात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ही परिस्थिती बदलण्याचा मी निर्धार केला आहे. मी २००७ पासून म्हणत होतो की, आपल्या शेतकऱ्यांनी ऊर्जा पुरवठादार बनले पाहिजे, आज उत्तर प्रदेशचा शेतकरी साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल तयार करत आहेत.”
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “आज मी घोषणा करतो की, येत्या तीन महिन्यांनंतर टोयोटा, सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या सर्व गाड्या फ्लेक्स इंजिन बनवतील. फ्लेक्स इंजिन म्हणजे १०० टक्के पेट्रोल टाका किंवा १०० टक्के इथेनॉल टाकून वाहने धावतील. आता आमची वाहने पेट्रोलपासून नव्हे तर उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो-इथेनॉलपासून चालतील. आता शेतकरी अन्नदाता नसून ऊर्जादाता होणार आहे.”
“माझ्याकडेही असे मंत्रालय आहे, जिथे पैशांची कमतरता नाही. राज्ये मागताना थकतील, पण देताना आपण थकणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार बनवा, येत्या पाच वर्षांत मी उत्तर प्रदेशात ५ लाख कोटींची कामे करून दाखवेन. मी त्या नेत्यांपैकी नाही जे पोकळ आश्वासनं देतात. गेल्या वर्षात जे मी बोललो ती सर्व कामे पूर्ण केलीत,” असं गडकरी म्हणाले.