महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । एसटी विलिनीकरणाबाबतची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. ही सुनावणी आता २२ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत आज वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांनी माहिती देताना, न्यायालयातील घडामोडींबाबतची माहिती दिली.
वकील सदावर्ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आम्ही आज सांगितलं की, परिवनहनमंत्री हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं बोलतात. ५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कर्मचारी नैराश्यात आहेत, ते काम करू शकत नाहीत. तसेच, आज सरकारचा आमचा आणि ज्या संघटना होत्या त्यांचा युक्तीवाद झाला. आज आम्ही न्यायालायासमोर ४८ हजार कष्टकऱ्यांचं लिखित प्रतिज्ञापत्र करून ते सादर केलं. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर आता २२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावर सुनावणी होणार आहे. अशी माहिती देखील सदावर्ते यांनी दिली.
याचबरोबर, कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय. बडतर्फ, सेवासमाप्ती, निलंबन केलं जातयं. असा आरोपही यावेळी सदावर्ते यांनी केला. तसेच, आम्ही आमचा लढा असाच सुरू ठेवणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.