महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ डिसेंबर । देशात ओमायक्रॉनचे (Omicron) वाढत्या रुग्णसंख्येमध्येही लोकं क्रिसमस आणि नवीन वर्षात जल्लोष साजरा करण्याची प्लॅनिंग करत आहेत. परंतु जगातील काही देशांनी खबरदारी घेत यावर्षी क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध आणले आहेत. नेदरलँडने १४ जानेवारीपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावला आहे. त्याठिकाणी शाळा, कॉलेज, म्युझियम, पब, डिस्कोथेक आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात येणार आहेत.
तर अमेरिका आणि ब्रिटन सरकारनेही क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अंशत: लॉकडाऊन करण्याचा विचार केला आहे. ब्रिटनमध्ये सध्या नाइट क्लब आणि पार्टीला जाण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केले आहे. इस्त्राइलने आजपासून अमेरिका, कॅनडा, जर्मनीसह १० देशांमधील प्रवाशांना देशात येण्यावर निर्बंध घातले आहेत. फ्रान्समध्ये सरकारने क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आतषबाजीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. जेणेकरुन लोकांनी गर्दी करु नये. आयरलँडमध्ये पब आणि बारमध्ये रात्री ८ नंतर प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या भारतात १६१ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. दिल्लीत मागील ६ महिन्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात १०० हून अधिक रुग्ण आढळले. देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ५४, दिल्ली ३२, तेलंगाना २०, राजस्थान १७, गुजरात १३, केरळ ११, कर्नाटक ८, उत्तर प्रदेश २, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, चंडीगढमध्ये ओमायक्रॉनचे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.
तज्ज्ञांनी दिला तिसऱ्या लाटेचा इशारा
ओमायक्रॉन संक्रमणाचा वेग पाहता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. आयआयटी कानपूरने जानेवारी, फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे. तर नीती आयोगाने देशात तिसरी लाट आली तर दिवसाला १४ लाख रुग्ण आढळू शकतात जो जगातील सर्वात मोठा आकडा ठरू शकतो असं म्हटलं आहे. तर एस्ट्राजेनेका कोविशील्ड लस बनवणाऱ्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे प्रोफेसर डेम सारा गिल्बर्ट यांनी पुढील महामारी आणखी जास्त घातक असेल असा इशारा दिला आहे. जोपर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत पूर्ण माहिती मिळत नाही तोवर सतर्क राहणं गरजेचे आहे असंही तज्त्रांनी म्हटलं आहे.