महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ डिसेंबर । टोमॅटोने काही दिवसांपूर्वी सफरचंदालाही मागे टाकले होते. कांदाही कडाडला होता. आता भेंडी-गवारने भाव खाल्ला आहे. किलोभर भेंडी आणि गवार घ्यायची झाली तर शंभराची नोट पाहिजे. दोघांचे दर दुपटीने वाढले आहेत. अवकाळी पाऊस आणि इंधन दरवाढीने मंडयांमध्ये महागाईची लाट आली आहे. 30 रुपये किलोने मिळणारी वांगी दुपटीपेक्षा जास्त महागली आहेत. 20-30 रुपये किलोपुढे मजल नसलेल्या गाजरानेही साठी ओलांडली आहे. या महागाईने सामान्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. त्यांच्या ताटातून भाजी वजा होऊ लागली आहे.
अवकाळी पावसाने भाजीपाल्याची नासधूस केली. शेतातील पिकांचे नुकसान झाले. नवा भाजीपाला पिकवण्यासाठी किमान महिना-दीड महिन्याचा कालावधी लागतो. दरम्यान आवक घटल्याने भाज्यांचे दर सतत वाढत आहेत. त्यातच इंधनाच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्या खर्चाशी हातमिळवणी करण्यासाठी व्यापाऱयांनी आवक कमी झाल्याचे कारण सांगत भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत.
मुंबईत पुणे, नाशिक, कल्याण येथून भाजीपाल्याची आवक होते. परंतु गेल्या दहा दिवसांमध्ये आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. बाजारात गेल्यानंतर किमान दोन-तीन दिवसांची भाजी तरी खरेदी केली जाते. पण आता केवळ एका वेळच्या किलोभर भाजीसाठी शंभराची नोट मोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. चांगल्या प्रतीचा टोमॅटो 50 रुपयांवरून 70 रुपयांवर पोहोचला आहे. मागणी असल्याने सध्या पूर्णपणे तयार न झालेले हिरवे टोमॅटो बाजारात येत असल्याचेही दिसून येत आहे.
सध्या नाशिक, पंजाब, सुरत, मध्य प्रदेशमधून आवक खूप कमी होत आहे. घाऊक भाज्या दामदुपटीने घ्याव्या लागतात. त्यामुळे दादर भाजी मंडईतील काही घाऊक विव्रेते भाज्या कमीच खरेदी करत आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत भाज्या संपल्या की गाळे बंद करून घरी जातात. सध्या 25 टक्के गाळे हे दुपारीच बंद होतात.
इतर भाज्या महाग झाल्या असल्या तरी सीझनल भाज्यांनी परिस्थिती थोडी सांभाळल्यासारखी दिसून येते. मटार, कोबी, घेवडा, दुधी यांची आवक वाढल्याने त्यांचे दर नियंत्रणात आहेत. आवक वाढली की भाज्यांचे भाव कमी होतात. इतर भाज्यांचे दरही महिनाभरानंतर कमी होतील, असा व्यापाऱयांचा अंदाज आहे.