महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ डिसेंबर । टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्यांना तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर 21 या कालावधीत खेळवला जाणार आहे. सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट पार्क येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान प्रेक्षकांविना सुनेसुने राहणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रोनचा वाढता प्रसार लक्षात घेऊन दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी तिकिटे न विकण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कोरोना गाईडलाइननुसार सरकारने 2000 लोकांना प्रवेशाची परवानगी दिली आहे, परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पहिली कसोटी प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असोसिएशन आणि स्थानिक पदाधिकारी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.
वाँडरर्स येथे 3 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबत अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाही. तिकिटे विक्रीसाठी ठेवली गेली नाहीत. स्टेडियमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे पोस्ट केले गेले आहे की, प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाईल.