महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । बर्याच लोकांना बड्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कपडे, शूज, चष्मा आदी अनेक उत्पादने वापरण्याची इच्छा असते, परंतु त्यांच्या किंमती खूपच जास्त असतात. त्यामुळे अनेकजण अशी ब्रँडेड उत्पादने खरेदी करू शकत नाहीत, त्यांना आपली इच्छा मनातच ठेवावी लागते. मात्र अनेकजण अशा बड्या ब्रँडची उत्पादने सहजपणे वापरताना दिसतात. आपल्यासारखीच आर्थिक स्थिती असणारी ही व्यक्ती इतक्या महागड्या (Highly Priced)वस्तू कशा वापरू शकते? या प्रश्नाचे उत्तर आहे फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी उत्पादने.
अनेक बड्या ब्रँडची उत्पादने अती महाग असल्याने सगळ्यांना ती खरेदी करणे शक्यचा नसते. अशावेळी या उत्पादनांची कॉपी करून अगदी हुबेहुब उत्पादन मात्र कमी दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर करून बनवले जाते. यात दोन प्रकार असतात ते म्हणजे फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी. दिल्लीत (Delhi)अनेक ठिकाणी अशी उत्पादने पहायला मिळतात. दिल्ली आणि कोलकाता इथे मोठ्या प्रमाणावर अशी उत्पादने बनवली जातात. देशात सर्वत्र त्याचा पुरवठा होतो.
फर्स्ट कॉपी उत्पादने ही मोठ्या ब्रँडच्या उत्पादनाची अगदी हुबेहूब कॉपी असते. मूळ ब्रँडेड आणि फर्स्ट कॉपी उत्पादनांमध्ये फरक करणे कठीण असते. या वस्तू अगदी सारख्याच दिसतात तसेच त्याचा अनुभवही सारखाच असतो, मात्र याच्या दर्जात फरक असतो. यावरील स्टिकर्स, ब्रोशर, टॅग अगदी मूळ ब्रँडसारखेच असते. पॅकिंगही अगदी हुबेहूब असते. हे डुप्लिकेट ब्रँडच्या नावाखाली विकले जातात. यांची गुणवत्ता (Quality)अगदी ब्रँडेड वस्तूंसारखी नसली तरी ती उत्तम असते. त्यासाठी वापरण्यात आलेला कच्चा माल चांगल्या दर्जाचा असतो. त्यामुळे ही उत्पादने वापरण्यास चांगली असतात. याचा अनुभवही चांगला येतो, त्यामुळे ही उत्पादने किमतीच्या मानाने महागच असतात.
सेकंड कॉपी फक्त दिसायला ब्रँडेड उत्पादनासारखी असतात पण त्यांचा दर्जा अगदीच कमी (Low Quality)असतो. ब्रँडेडचा भास ते निर्माण करू शकतात पण हातात घेऊन पाहिल्यावर त्यातील फरक जाणवतो. त्याचा दर्जा हलका असल्याचे लक्षात येते. याचे पॅकेजिंगही दुय्यम दर्जाचे असते. त्यामुळे ही उत्पादने अगदी स्वस्त किमतीत मिळतात. ही सेकंड कॉपी उत्पादने केवळ दिखाऊपणासाठी वापरली जाऊ शकतात, परंतु ती पहिल्या प्रतीच्या तुलनेत अगदीच निकृष्ट असतात.
उदाहरणार्थ, तुम्ही रे बॅनचे (Ray Ban)काही गॉगल्स घ्यायला गेलात तर त्याची किंमत सुमारे 7000 रुपये आहे. तुम्हाला इतके महागडे गॉगल्स नको आहेत, आणि तसे तुम्ही दुकानदाराला सांगितले तर तो तसाच दिसणारा गॉगल 800 रुपयांनादेखील उपलब्ध करून देईल. फक्त त्याचे नाव वेगळे असेल किंवा स्पेलिंगमध्ये काही फरक असेल किंवा ते फर्स्ट कॉपी उत्पादन असेल. मोठ्या ब्रँड्सची शूज, कपडे, घड्याळे, गॅझेट्स अशी अनेक उत्पादने फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी प्रकारात बाजारपेठेत सहज उपलब्ध आहेत. मात्र फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी प्रकारातील उत्पादने मूळ ब्रँडच्या नावाने विकता येत नाहीत. असे केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरतो. असा प्रकार उघडकीस आल्यास मूळ कंपन्या कॉपीराइट आणि डुप्लिकेशनसाठी दावा करू शकतात.
तेव्हा आता एखाद्या महागड्या ब्रँडची वस्तू घ्यायची असेल आणि त्याची किंमत खूपच असेल तर तुम्ही त्याची फर्स्ट कॉपी घेऊन समाधान मानू शकता किंवा सेकंड कॉपी खरेदी करू शकता. एखादी वस्तू ओरिजिनल आहे की याचीही खात्री आता तुम्हाला सहज करता येईल.