महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि भाजपमध्ये (bjp) आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (winter season maharashtra 2021) मुंबईत सुरू होतं आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप (bjp) आणि महाविकास आघाडीचे नेते आता आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या अधिवेशनात वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे पुढे ढकलण्यात आलेले हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांमुळे पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. आज अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सकाळीच विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमकपणे निदर्शने करण्याची रणनिती आखली आहे.
तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षणाच्या मूद्यांवर भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार यात वादच नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशिल असलेले ‘शक्ती’ विधेयक विधिमंडळाच्या पटलावर आणणार आहे. या विधेयकावरूनही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने सामने येणार आहेत.
याच बरोबर प्रलंबित ५ विधेयकं आणि प्रस्तावित २१ विधेयकं ही विधिमंडळाच्या पटलावर येणार आहेत. या पाच दिवसांच्या अधिवेशनात किती विधेयकं मंजूर होतात यावर महाविकास आघाडी सरकारचं यश अवलंबून आहे.
मात्र आज पहिल्याच दिवशी सर्वांचं लक्ष असणार आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीकडे. मणक्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीरपणे सर्वांच्या समोर येणार आहेत. त्यापूर्वी ते सकाळी 9 वाजता विधामंडळात सत्ताधारी महविकास आघाडी सरकारच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत विधानसभेचे अध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्याता आहे.