कामावर हजर व्हा, नाही तर सरकारकडे प्लॅन बी तयार! अनिल परब यांचा एसटी कामगारांना इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । एसटीच्या संपाची नोटीस देणाऱ्या कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतल्यामुळे राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील सर्व प्रकारची कारवाई मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. उद्या, 22 डिसेंबरपर्यंत कामगारांनी आपापल्या आगारात येणे अपेक्षित आहे. मात्र कामगारांनी हे ऐकले नाही तर सरकारकडे ‘प्लॅन बी’ तयार असल्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी म्हटले आहे. एका खासगी वाहिनीशी बोलताना परब यांनी कामगारांना हा निर्वाणीचा इशारा दिला असला तरी ‘प्लॅन बी’ नेमका कोणता आहे? हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.

एसटी विलीनीकरणाचा मुद्दा वेळखाऊ असून त्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाने 12 आठवडय़ांचा वेळ दिला आहे. तरीही अॅड. गुणरत्न सदावर्ते कर्मचाऱ्यांना तातडीने न्याय मिळेल, असे सांगत आहेत. ते कामगारांना चुकीच्या वाटेवर नेत आहेत. संप सुरूच राहिला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल, ही बाब सदावर्ते यांना वकील म्हणून ठाऊक आहे. म्हणून ते संपाऐवजी ‘दुखवटा’ असा शब्द वापरत असून कामगारांचे नुकसान करीत असल्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी म्हटले आहे.

एसटी महामंडळ 12 हजार कोटींच्या तोटय़ात आहे. त्यात अजून सहा हजार कोटींच्या तोटय़ाची भर पडली आहे. अशाने जर एसटी जगलीच नाही तर कसे होणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्य सरकार एसटीला संकटात बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु एसटी कामगारांनीच असहकार्य केले तर कसे चालेल, असेही ते म्हणाले.

 

आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी उद्या, 22 डिसेंबरपर्यंत हजर व्हावे.

मराठवाडा, अमरावती व नागपुरातील कर्मचाऱ्यांनी 23 डिसेंबरपर्यंत हजर व्हावे.

वाहतूक पूर्ववत झाल्यावर कर्मचाऱ्यांचे निलंबन तत्काळ मागे घ्यावे.

बडतर्फ झालेल्यांची शिस्त व आवेदन पद्धतीने बडतर्फी मागे घ्यावी.

सेवा समाप्तबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवून कारवाई मागे घ्यावी.

बदली झालेल्यांनी हजर झाल्यास तत्काळ बदली रद्द होणार.

संपात गुन्हे दाखल झालेल्यांवर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हे मागे घेणार.

एसटी कामगारांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा…

एसटी विलीनीकरणाबाबत कर्मचाऱ्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा. मी कबूल केलेली पाच हजार वेतनवाढ दिली आहे. एसटी कामगारांना आतापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आता कर्मचाऱ्यांनी ठरवावे, असे परब यांनी सांगितले. एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटी बंद पडल्याने जनता अडचणीत सापडली आहे. त्यांची अडवणूक करू नये. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जनतेला वेठीला धरणे योग्य नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. उद्यापर्यंत रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाईल, असे आश्वासन अनिल परब यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *