महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ३१ डिसेंबर हा दिवस शिर्डी महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नाताळ सुटी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त होणारी संभाव्य गर्दी व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी शिर्डीला यावे. दरवर्षी नियमित पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये, असे आवाहन संस्थानच्या मख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बागायत यांनी केले.
श्रीमती बागायत म्हणाल्या की, श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी नाताळ सुटी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला येऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतात. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून शेकडो पालख्यांसह पदयात्री शिर्डीत हजेरी लावतात. परंतु, या वर्षीही पुन्हा संपूर्ण देश व राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आलेले होते. त्यामुळे यावर्षी व मागील वर्षी संस्थानच्या वतीने साजरे करण्यात येणारे श्री रामनवमी, श्री गुरुपौर्णिमा व श्री पुण्यतिथी उत्सव अतिशय साध्या पद्धतीने व भाविकांविना साजरे करण्यात आले आहेत. या सर्व उत्सवांत पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये, असे आवाहनही संस्थानच्या वतीने पदयात्री साईभक्त व पालखी मंडळांना करण्यात आले आहे. शासनातर्फे ५ एप्रिलपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. परंतु, शासनाने ७ ऑक्टोबरपासून काही अटी शर्तीवर धार्मिक स्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार श्री साई बाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून ठराविक संख्येने भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. परंतु, कोरोना सावट संपलेले नसल्याने साई भक्तांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. संस्थानतर्फे विविध उपाययोजना ही करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नाताळ सुटी, नवीन वर्ष स्वागतासाठी शनिवार (२५ डिसेंबर) ते रविवार (दि. २ जानेवारी) याकालावधीत गर्दी होऊ नये म्हणून साई भक्तांंनी शिर्डीत श्रींचे दर्शनासाठी येताना online.sai.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पास निश्चित झाल्यानंतरच प्रवासाचे नियोजन करावे.
काेराेना नियमांचे पालन करावे लागणार
शासनाच्या निर्देशानुसार भाविकांनी मास्क लावणे, हात सॅनिटायझेशन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, दर्शन रांगेतील इतर वस्तूंना आणि श्रींच्या समाधीस स्पर्श करू नये. मंदिरात फुले, हार, प्रसाद व इतर पूजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जे साईभक्त आजारी आहेत, अशा साईभक्तांनी दर्शनासाठी येऊ नये. पदयात्री साईभक्तांनी व पालखी मंडळांनी पालखी आणू नये. सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.
साईभक्तांनी व मंडळांनी पालखी आणू नये
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे श्रींच्या दर्शनासाठी ठराविक संख्येने मंदिरात प्रवेश दिला जात असल्यामुळे व दर्शनपास वितरण काउंटरवर होणाऱ्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकिंग निश्चित करून साईभक्तांनी शिर्डीत दर्शनासाठी यावे. अन्यथा आपली गैरसोय होऊ शकते.