मराठवाडा गारठला :परभणीत तापमानाचा पारा 7.6 अंश सेल्सियसवर, शेकोट्या पेटल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । मराठवाड्यात हळूहळू गुलाब थंडीचा जोर वाढत आहे. दिवसभर चांगलीच हुडहुडी भरलेली पाहायला मिळतेय. दरम्यान, मराठवाड्यात अनेक ठिकाणी थंडीचा पारा घसरला असून पहाटेच्या आणि सायंकाळच्या वेळी झोंबणारे गार वारे सुटत आहेत.

परभणीचा पारा मंगळवारी २१ डिसेंबर राेजी ७.६ अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली आहे. मंगळवारी नोंदवलेले किमान तापमान हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान आहे. परभणी शहर आणि परिसरात सकाळी दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. दरम्यान, परभणीच्या तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी परभणीचे तापमान ९.५ अंश सेल्सियसवर होते. यात घट होऊन मंगळवारी ७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी (१९ डिसेंबर) परभणीचा पारा १०.६ अंश सेल्सियसवर, शनिवारी १० अंश सेल्सियस आणि शुक्रवार रोजी ११ अंश सेल्सियसवर होता.

परभणीच्या तापमानात मागील काही दिवसांत सातत्याने घट होत आहे. सर्वत्र पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थंडगार वारे वाहत असून यंदा बोचऱ्या थंडीचा परभणीकरांना सामना करावा लागतोय. थंडगार वारे वाहू लागले असून गल्लीबोळात जागोजागी शेकोट्यांचा आधार नागरिक घेत आहेत. मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत.

साधारणपणे नोव्हेंबरमध्ये थंडी असते. पण या वर्षी नोव्हेंबरमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे ही मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी जाणवत होती.दरवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात थंडी उशिरा दाखल झाली. हळूहळू थंडीचा जाेर कमी हाेत जाताना पाहायला मिळताे. पुढील २४ तासांत किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मात्र नंतर हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पिकांसाठी ही थंडी पाेषक आहे का?
रब्बी हंगामातील गहू, करडी, हरबरा आदी पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी थंडीचीच आवश्यकता असते. त्यामुळे ही थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर असणार आहे.

नांदेडमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सियस
नांदेड | शहरासह जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून गारठा वाढला आहे. मंगळवारी किमान ११.०, कमाल तापमान २८.० अंश सेल्सियस इतके होते. त्यामुळे नागरिक उबदार कपडे खरेदीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालय, कला मंदिर येथे गर्दी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *