महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी करण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले.ज्या जिल्ह्यामध्ये एका आठवड्यात रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल किंवा ४० टक्के खाटा रुग्णांनी व्यापल्या असतील तर त्या जिल्ह्यामध्ये निर्बंध आणि कठोर नियमावली जारी करावी.रुग्णसंख्या अधिक झाल्यास रात्रीची संचारबंदी, मेळाव्यांवर निर्बंध, विवाह सोहळा, अंत्यंसंस्कार यांसाठी उपस्थित असणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा, कार्यालयीन उपस्थिती आणि सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवासी संख्या यांवर मर्यादा अशा प्रकारची नियमावली जारी करावी.
कंटेन्टमेंट झोनमध्ये नियमांचे पालन करणे सक्तीचे करणे. त्याशिवाय बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी कोणताही विलंब न करता प्रयोगशाळांकडे पाठवणे.बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, चाचण्यांची संख्या वाढवणे, घरोघरी जाऊन बाधितांचा शोध घेणे आदी नियमावली तयार करावी.
अमेरिका, युरोपमध्ये भीती
अमेरिकेत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या आठवड्यात एकूण करोनाबाधितांपैकी तीन टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे होते. मात्र ही संख्या वाढून आता देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ७३ टक्के आहे. युरोपमध्येही ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असून युरोपमधील अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.