महाराष्ट्र २४- मुंबई ; जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसनं भारतातही वेगाने प्रवेश केला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर कोरोना एक बळी घेतला आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात 64 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक शासकीय कर्मचारी, विभाग धास्तावले आहेत. खासगी क्षेत्रातही जवळपास 50 टक्के कर्मचारी घरातून काम (Work From Home) करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय कार्यालये देखील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासकीय अत्यावश्यक सेवा सोडून इतर कार्यालय बंद करता येईल का, यावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.