महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । पालिकेच्या वतीने आयोजित ‘हेरिटेज सप्ताहा’त येथील सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे ‘व्हिंटेज कार’सोबतच हेरिटेज वास्तूंच्या फोटो प्रदर्शनासह अनेक हेरिटेज वस्तू, शस्त्रांचे प्रदर्शनदेखील पाहता येणार आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटनास येणाऱया पर्यटकांसह शहरवासीयांसाठी ही पर्वणीच असून, या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रयत्नांतून ‘स्वच्छ सर्वेक्षण-2022’, ‘आझादी का अमृत महोत्सव’ व ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथील सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे ‘हेरिटेज सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त पालिकेच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. या हेरिटेज सप्ताहात हेरिटेज वास्तूंची छायाचित्र प्रदर्शन असून, या प्रदर्शनात महाबळेश्वर शहरातील हेरिटेज वास्तूंचे जुने व सद्यःस्थितीतील फोटो लावले आहेत.
हेरिटेज सप्ताहानिमित्त नुकतेच येथील गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘वारसा जतनस्थळाचे महत्त्व’ व ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नागरिकांची जबाबदारी व कर्तव्य’ या दोन विषयांवर चार गटांमध्ये निबंध स्पर्धा पार पडली. या निबंध स्पर्धेत 100हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. तर, आजपासून या प्रदर्शनामध्ये व्हिंटेज कार ठेवण्यात आल्या असून, यामध्ये मर्सिडिस बेन्ज, ऍम्बेसिडर, फियाट, डय़ुक्स व फोल्सवॅगन अशा काही कंपन्यांच्या दुर्मीळ क्लासिक मॉडेल्स पाहता येणार आहेत.
हेरिटेज सप्ताहानिमित्त 25 डिसेंबर रोजी येथील प्रसिद्ध मुंबई पॉइंट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 26 डिसेंबर रोजी सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे मान्यवर व तज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 27 डिसेंबर रोजी या हेरिटेज सप्ताहाचा समारोप सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे बक्षीस वितरण समारंभाने होणार आहे.
शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनदेखील येथे असून, यामध्ये चिलखत, तलवारी, ढाल, भाले, दांडपट्टे, कुऱहाडी, धनुष्यबाण, अनेक प्रकारच्या, आकाराच्या बंदुकींसह एक छोटी तोफ या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. या प्रदर्शनात अनेक हेरिटेज वस्तूदेखील ठेवण्यात आल्या असून, नागरिकांसह पर्यटकांना या वस्तू पाहता येणार आहेत.