महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढल्यामुळे उत्तर प्रदेशात होणारी गर्दी टाळण्यासाठी सभांवर बंदी घाला, निवडणुका पुढे ढकला असा विनंतीवजा सल्ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला दिला. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारला जाग आली असून, रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध लोकार्पण आणि भूमीपुजनांचे कार्यक्रम उत्तर प्रदेशात होत आहेत. यावेळी होणाऱया गर्दीमुळे कोविड नियमांचा फज्जा उडत आहे. यावर दाखल झालेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शेखरकुमार यादव यांनी चिंता व्यक्त करीत थेट मोदी आणि निवडणूक आयोगाला सल्ला दिला. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.