महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीच्या पाचव्या क्रमांकासाठी र्अंजक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाची निवड करणे अवघड जाईल, असे भारताचा उपकर्णधार केएल राहुलने शुक्रवारी सांगितले. याचप्रमाणे भारतीय संघ पाच गोलंदाजांच्या रणनीतीसह खेळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ गेला आठवडाभर सराव करीत आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ कधीही कसोटी मालिका जिंकला नसल्यामुळे मालिकेची विजयी सुरुवात आवश्यक आहे, असे राहुलने सांगितले.
भारतीय संघ चार गोलंदाजांसह खेळल्यास अतिरिक्त फलंदाज खेळवता येईल, या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाला, ‘‘कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी बाद करण्याची आवश्यकता असते. परदेशात खेळताना हीच रणनीती भारतासाठी यशस्वी ठरत आली आहे. त्यामुळे खेळाच्या ताणाचेही उत्तम व्यवस्थापन होऊ शकेल.’’
वेगवान माऱ्याची निवड करताना फलंदाजीच्या उत्तम कौशल्यामुळे शार्दूल ठाकूरला अनुभवी इशांत शर्मापेक्षा प्राधान्य मिळू शकेल. राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे पहिल्या चार क्रमांकावर तर ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल. परंतु पाचव्या क्रमांकासाठी अय्यर, रहाणे आणि हनुमा विहारी हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. याबाबत राहुल म्हणाला, ‘‘रहाणे हा कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने आपल्या संस्मरणीय खेळींच्या बळावर भारताला अनेकदा तारले आहे. लॉड्र्सवर पुजाराच्या साथीने साकारलेली खेळी भारताला कसोटी विजय मिळवून देणारी ठरली. परंतु कानपूरमधील शतक आणि अर्धशतकामुळे अय्यरने लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे आव्हानात्मक ठरेल.’’
द्रविडमुळे मनोसामर्थ्य उंचावले -अगरवाल
भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मनोसामर्थ्य उंचावणारे मार्गदर्शन उपयुक्त ठरले, असे सलामीवीर फलंदाज मयांक अगरवालने सांगितले. इंग्लंडमधील पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतर कर्नाटकचा ३० वर्षीय फलंदाज मयांकने भारतीय संघातील स्थान गमावले. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार पुनरागमन करताना मयांकने अनुक्रमे १५० आणि ६२ धावांच्या खेळी साकारल्या.