महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी- दि. 26- तळेगाव दाभाडे : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी या महिन्याच्या १६ तारखेला सशर्त उठवली. त्यानंतर राज्यात पहिल्यांदा ही शर्यत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तळेगाव दाभाडे (ता.मावळ, जि. पुणे) एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे होणार आहे. त्यामुळे चार वर्षानंतर पुन्हा हु र्र आणि झाली रे होऊन घाटात धुरळा उडणार आहे.
बैलगाडा शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर राज्यात प्रथमच बैलगाडा शर्यतींचा घाट भरत असून हा राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. या आनंदोत्सवात राज्यातील सर्व बैलगाडा मालक व बैलगाडा शौकिनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
नाणोली तर्फे चाकण येथील दत्त जयंती उत्सव समिती तसेच मोनिका शिंदे व सुधाकर शेळके यांनी गावामधील दत्त जयंती यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी असल्याने गेल्या 7-8 वर्षांपासून या यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करता आले नव्हते.