महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी – दि.26 डिसेंबर: मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. यानंतर आता राज्यात अवकाळी पावसाची (non seasonal rain) स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसानंतर मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (rain and hailstorm) होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात निर्माण झालेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडण्याची शक्यता आहे.
खरंतर, सध्या वायव्य आणि मध्य भारतात पश्चिमी चक्रावात आणि त्याच्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहेत. त्यामुळे हरियाणासह उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या भागात मुसळधार पावसासह गारपिटचा इशारा देण्यात आला आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून राज्यातही अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. मंगळवारपासून राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा विक्रमी घसरला होता. बहुतांशी ठिकाणाचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं होतं. पण आता उत्तर भारतात थंडीची लाट ओसरली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातही गारठा कमी होणार आहे. पुढील पाच दिवस देशात कुठेही थंडीची लाट येण्याची शक्यता नाही.
पुढील काही दिवस पुण्यात निरभ्र हवामान राहण्याची शक्यता आहे. पण दोन दिवसानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शनिवारी पुण्यात 12.8 अंश सेल्सिअस किमान तर 32.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त शनिवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापुरात 33.1 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं आहे. तर जळगावात 10.4 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.