धोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, रूग्णवाढीने गांभीर्य वाढतेय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली आहे. (Coronavirus) जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीय. राज्यात 24 तासांत दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईचा आकडाही एक हजारांपलिकडे गेलाय. राज्यात 2 हजार 172 तर मुंबईत 1 हजार 377 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.

राज्यात गेल्या 24 तासांत 50 टक्के रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईतही संख्या तब्बल 70 टक्क्यांनी वाढलीय. वाढलेल्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत दिले आहेत. तसंच जानेवारी आणि फेब्रुवारीत रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यताही राजेश टोपेंनी वर्तवलीय. तर लवकरच तिसरी लाट येणार असल्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केली.

रूग्णवाढीने गांभीर्य वाढतेय
महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी ट्विट करून राज्यातल्या रूग्णवाढीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले आहे. पहिल्या लाटेत रुग्णवाढ डबलिंग होण्यात 12 दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेत 20 दिवस लागले. मात्र, चिंतेची बाब म्हणजे तिसऱ्या लाटेत फक्त चारच दिवसात रुग्ण डबलिंग झालेत…यामुळे आतापासूनच काळजी घ्या आणि नियम पाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय
मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. त्यात मुंबईत सील इमारतींची संख्या दोन दिवसांत दुप्पट झालीय. पाचहून अधिक कोविड बाधीत आढळले तर इमारत सील केली जाते. अंधेरी पश्चिम आणि ग्रँटरोड भागात सर्वाधिक इमारती सील झाल्या आहेत. 25 डिसेंबरपर्यंत 17 इमारती सील होत्या. तर आता ही संख्या 37 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *