सिंधुदुर्ग जिंकलं ; आता पुढचं लक्ष्य महाराष्ट्राची सत्ता: नारायण राणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विजय हा माझा एकट्याचा नाही, तर तो भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनतेच्या आशीर्वादाने जिल्हा बँकेत भाजपची सत्ता आली. हा विजय प्रचंड असा आहे. आता आमचं पुढचं लक्ष्य महाराष्ट्राची सत्ता मिळवणे, हेच असेल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. ते शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी महाविकासआघाडीला टोले लगावत चौफेर फटकेबाजी केली.

आगामी काळात कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये विधानसभेत आणि लोकसभेत भाजपचाचा विजय होईल. सिंधुदुर्गाचा पुढचा खासदार हा भाजपचाच असेल. वर्षानुवर्षे असलेल्या आणि नको झालेल्या चेहऱ्यांना जनता घरी पाठवेल. महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्याची आणि सरकारची गरज आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच मी इतकी वर्षे सगळ्यांना पुरुन उरलोय. आता केंद्रापर्यंत पोहोचलोय. त्यामुळे मला कोणत्याही चौकश्यांनी फरक पडत नाही, असेही राणे यांनी म्हटले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे पॅनल हे राजन तेली यांच्या नेतृत्त्वाखाली लढत होते. मात्र, या निवडणुकीत राजन तेली यांचा पराभव झाला. या पराभवानंतर राजन तेली यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. याविषयी नारायण राणे यांना विचारण्यात आले. त्यावेळी राणे यांनी म्हटले की, राजन तेली यांच्याबाबतीत गड आला पण सिंह गेला, अशी गत होऊ देणार नाही. भाजप असे राजकारण करते की गड आणि सिंह दोन्ही राखते. इथून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता आहे. त्यामळे आम्ही राजन तेली यांची वर्णी कुठेतरी नक्की लावणार, असे नारायण राणे यांनी म्हटले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे कोकणात आले होते. यावेळी त्यांनी संस्था उभ्या करायला आणि चालवायला अक्कल लागते, असा टोला नारायण राणे यांना लगावला होता. त्याची परतफेड नारायण राणे यांनी केली. या निवडणुकीत विजय मिळवताना अकलेचा वापर झाला. जिल्हा बँक ही अक्कल असलेल्यांच्या ताब्यातच गेली आहे. अर्थखात्याचे मंत्री याठिकाणी येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करुन जातात. याला अक्कल म्हणतात का, असा टोला नारायण राणे यांनी अजित पवारांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *