पुण्यात पालकमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर नवी नियमावली ;तूर्तास शाळा बंदचा निर्णय नाही ; महापौरांकडून स्पष्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यात काल कोरोनाचे 524 नवे रुग्ण आढळून आले. तसंच 36 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असंही महापौर म्हणाले.

पुण्यातील कोरोनास्थिती आणि आरोग्य व्यवस्थेबाबत माहितीही महापौरांनी या बैठकीनंतर दिली. मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 27 डिसेंबरपासून ते कालपर्यंत रुग्णसंख्या अडीच हजारापर्यंत पोहोचली आहे. महापालिकेत आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं नाहीत. ओमिक्रॉनचे 27 रुग्ण आहेत. यात दोन्ही डोस घेतलेले 70 ते 75 टक्के लोक आहेत. त्यामुळे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असं महापौरांनी सांगितलं.

शाळेबाबतचा निर्णय पालकमंत्र्यांच्या बैठकीत होणार
लसीकरणाबाबत पुणे राज्यात सर्वात पुढे आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस सुरु करत आहोत. तसंच नवीन निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यात शाळा, उद्यानं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विचार केला जाईल, असं महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात आरोग्य व्यवस्था सज्ज
त्याचबरोबर पुण्यात मुबलक औषधांचा साठा आहे. 4 हजार रेमडिसिव्हर आहेत. तसंच 1 हजार 800 बेड आता महापालिकेकडे आहेत. 12 ऑक्सिजन प्लांट आहेत. सूचना मिळाली तर 7 दिवसांच्या आत जम्बो रुग्णालय चालू करु शकतो. जम्बो रुग्णालयाची पूर्ण तयारी झाल्याचंही महापौर म्हणाले. तसंच आधीच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी होईल. कारवाई करण्यासाठी भरारी पथकं तयार केली जाणार असल्याचंही महापौरांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *