महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । अनुभवी खेळाडू म्हणून संघाने किती दिवस तुमच्या फलंदाजीतील फ्लॉप शोचे ओझे वाहायचे, असा संतप्त सवाल करीत हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर फलंदाजीत फ्लॉप शो करणारे चेतेश्वर पुजारा (3) आणि अजिंक्य रहाणे (0) यांना आता त्यांची कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी केवळ एकच डाव उरला आहे. त्या डावातही ते पुन्हा अपयशी ठरले तर त्यांचे काही खरे नाही, असा गंभीर इशारा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी दिला आहे.
जोहान्सबर्ग कसोटीच्या सुरुवातीआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला. कर्णधार विराट कोहलीने या लढतीतून माघार घेतली. त्यानंतर कर्णधारपद भूषवणाऱ्या के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण मयांक अगरवाल (26) बाद झाल्यावर अनुभवी चेतेश्वर पुजाराही 33 चेंडू खेळून केवळ 3 धावांत तंबूत परतला. त्यानंतर माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शून्यावर तंबूत परतावे लागले. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 3 बाद 49 अशा चिंताजनक स्थितीत आला. पुजारा आणि रहाणेच्या या बेजबाबदार खेळावर गावसकर अतिशय नाराज झाले आहेत.