लवकरच सर्वच शहरांत पाचशे चौरस फुटांच्या घरांना करमाफी, औरंगाबाद महापालिका क्षेत्रातही योजना राबवू : सुभाष देसाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । मुंबई आणि ठाण्यात पाचशे चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ही याेजना राज्यातील सर्वच शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येईल. औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रातही ही योजना राबवता येईल, अशी माहिती राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी साेमवारी औरंगाबादेत दिली.

१५ ते १८ वयाेगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाचा प्रारंभ साेमवारी औरंगाबादेत पालकमंत्री देसाईंच्या हस्ते झाला. या वेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राज्य सरकारने मुंबई-ठाण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील सर्वच शहरांमधून करमाफीचा निर्णय घेण्याबाबत मागणी जाेर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘औरंगाबादसाठीही असा निर्णय घेतला जाणार का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा देसाई म्हणाले, ‘मुंबईने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. हळूहळू इतर शहरांसाठीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाईल.’

दरम्यान, राज्यातील इतर शहरांमधील घरांना करमाफीचा निर्णय झाल्यास औरंगाबादेतील सिडको-हडकोवासीयांसह अनेक छोट्या गरीब आणि मध्यमवर्गीय वस्त्यांना दिलासा मिळू शकतो. मनपा क्षेत्रात ८०० ते १००० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना व मालमत्तांना ही सूट मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत असल्याचे राजेंद्र दाते पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *