महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात फक्त पुण्यात तब्बल 1 हजार 104 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांचा एवढा मोठा आकडा वाढल्याने पॉझिटिव्हीटी रेट हा थेट जवळपास 18 टक्क्यांवर गेल्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई आणि पुणे शहर सर्वाधिक बाधित ठरले होते. त्यानंतर आतादेखील हे दोन मोठी शहरं मोठ्या प्रमाणात बाधित ठरताना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी मृत्यूच्या आकड्यांमध्ये सध्यातरी वाढ झालेली नाहीय. पुण्यात आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय. तर 151 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
चिंता नको, काळजी घ्या : महापौर मुरलीधर मोहोळ
नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी त्यात बहुतांश रुग्ण हे लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असणारे आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आपली आरोग्ययंत्रणा सक्षमपणे सज्ज ठेवली असून पुणेकरांनी चिंता न करता स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मागील आठवडाभरात सक्रीय रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात 80 टक्क्यांपर्यंत रुग्ण हे लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. तरीही आपण पूर्ण क्षमतेने तयारी केली आहे.