नव्या वर्षातला सगळ्यात मोठा उलटफेर, बांगलादेश इतिहास घडवण्याजवळ !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship) पहिला मोसम जिंकणारी न्यूझीलंड (New Zealand) आता आपल्याच घरात अडचणीत सापडली आहे. बांगलादेशविरुद्धच्या (New Zealand vs Bangladesh) पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचा स्कोअर 147/5 एवढा झाला आहे. किवी टीमकडे फक्त 17 रनची आघाडी आहे. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने 328 रन केले, यांनंत बांगलादेशने 458 रन करत आघाडी घेतली. टेस्ट क्रमवारीमध्ये न्यूझीलंड दुसऱ्या तर बांगलदेश नवव्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडचं घरच्या मैदानातलं रेकॉर्ड शानदार आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये आणि 17 टेस्टमध्ये न्यूझीलंडचा घरच्या मैदानात पराभव झालेला नाही. या दरम्यान टीमने 13 टेस्ट जिंकल्या, तर 4 टेस्ट ड्रॉ झाल्या. म्हणजेच किवी टीमने 76 टक्के मॅच जिंकल्या. पण बांगलादेशच्या बॉलरनी उत्कृष्ट कामगिरी करत टीमला विजयाची आशा दाखवली आहे. फास्ट बॉलर इबादत हुसैनने दुसऱ्या इनिंगमध्ये आतापर्यंत 4 विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमधली त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

रॉस टेलर (Ross Taylor) 37 रनवर खेळत आहे, त्यामुळे आता न्यूझीलंडला वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे. कर्णधार केन विलियमसन दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळत नाहीये. बांगलादेशच्या पहिल्या इनिंगमध्ये कर्णधार मोमीनुल हक, महमदूल हसन जॉय, शंटो आणि लिटन दास यांनी अर्धशतकं केली. न्यूझीलंडची फास्ट बॉलरची चौकडी टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, काईल जेमिसन आणि नील वॅगनर यांनाही बांगलादेशच्या बॅटिंगला रोखता आलं नाही.

बांगलदेशची टीम न्यूझीलंडमध्ये 10 वी टेस्ट खेळत आहे. याआधीच्या सगळ्या 9 टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. एवढच नाही तर बांगलदेशने यातल्या 5 टेस्ट इनिंगच्या फरकाने गमावल्या आहेत. त्यामुळे यंदा हा रेकॉर्ड पुसून इतिहास घडवण्यासाठी बांगलदेशची टीम आग्रही असेल.

न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) या मोसमात आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. टीम या मोसमातली दुसरी सीरिज खेळत आहे. पहिले भारताविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडचा 1-0 ने पराभव झाला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम 16.66 परसेंटेज पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. बांगलदेशला अजून एकही पॉईंट मिळालेला नाही. याआधी त्यांचा पाकिस्तानविरुद्ध 2-0 ने पराभव झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *