Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज, बुधवारी होणार सुनावणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । आर्थिक गैरव्यवहाराच्या (Money laundering Case) आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्या या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

अनिल देशमुख सध्या आर्थर रोड (Arthur road jail) जेलमध्ये आहेत. 10 जानेवारीपर्यंत त्यांना जेलमध्ये राहावे लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी देशमुख यांना 2 नोव्हेबर 2021 रोजी अटक करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने पाच वेळा समन्स बजावले होते. परंतु, अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. परंतु, 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी त्यांची 12 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली.

अनिल देशमुखांवरील आरोप
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु, कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *