महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणारी हजेरी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (५ जानेवारी) सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे हजेरीपटावर सही करून उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
त्याचबरोबर मंत्रालयात व नवीन प्रशासकीय इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बसवण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीन्स पुरेशा प्रमाणात नसल्याचे आढळून आले होते. परिणामी उपस्थिती नोंदवताना मोठ्या प्रमाणात गर्दी आणि गोंधळ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता मंत्रालयाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशीन्स बसवण्याचे आदेश माहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्यात आले आहेत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत असून रुग्ण वाढीची संख्या एका दिवसात एक लाखाच्या जवळ पोहोचली आहे. बुधवारी देशभरात ९०,६१० नव्या रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी ५५,०६४ रुग्ण आढळले होते.यापूर्वी ४ एप्रिल २०२१ रोजी देशात एक लाख रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या आठ दिवसात रुग्णांची संख्या ६.३ पटीने वाढली आहे.
देशात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून संसर्गाचा दर दाखवणारी आर व्हॅल्यू २.६९ झाली आहे. दुसऱ्या लाटेवेळी हाच दर १.६९ होता. रुग्णसंख्या वाढीमागे ओमायक्रॉन हाच एकमेव विषाणू आहे, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.
राज्यात बुधवारी २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ओमायक्रॉन बाधितांमध्ये १४४ नव्या रुग्णांची भर पडली. ओमायक्रॉन बाधितांमध्ये १०० रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मंगळवारच्या तुलनेत गेल्या २४ तासांमध्ये ८ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण वाढले आहेत. अर्थात रुग्णसंख्या वाढत असली तरीही बरे होण्याचे प्रमाण उत्तम असून दिवसभरात ५,३३१ रुग्ण घरी परतले असून तर ८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आता एकूण ८७,५०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ७९७ वर गेली आहे.
कोरोना चाचण्या वाढवणार आहोत. केवळ आरटीपीसीआर केली तर लोड येईल म्हणून शहरांच्या चौकाचौकांत अँटिजन चाचण्यांची व्यवस्था करण्याचा विचार असून अँटिजन पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर होणार नाही. क्वॉरंटाइनचा कालावधी निम्म्याने घटवण्यात आला असून तो १४ ऐवजी ७ दिवसांचा करण्यात आला आहे.