Nashik Corona | लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट गडद होत आहे. तर दुसरीकडे राज्यात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाचादेखील प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानानेही मोठा निर्णय घेतलाय. ज्या भक्तांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील त्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. याआधी असाच निर्णय वणी देवस्थानाने घेतला होता.

दोन्ही डोस घेतले तरच मंदिरात प्रवेश
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थानाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. येथे ज्या भाविकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील अशांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. त्यासाठी भक्तांना कोरोना लस घेतली असल्याचे सर्टिफीकेट दाखवावे लागणार आहे. वणी पाठोपाठ त्रंबकेश्वर देवस्थानाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या बरोबरच 10 वर्षांच्या आतील बालकांना आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय झालेल्या नागरिकांनाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. 8 जानेवारीपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

तब्बल आठ हजार खाटा सज्ज
दरम्यान, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता महापालिकेने खबरदारी घेणे सुरु केले आहे. नाशिकच्या रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *