महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । अजिंक्य रहाणे (७८ चेंडूंत ५८ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (८६ चेंडूंत ५३ धावा) या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडूंनी बुधवारी अर्धशतकी खेळी साकारून स्वत:ची कारकीर्द वाचवण्यासह भारतालाही सावरले. परंतु त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केल्यामुळे उभय संघांतील दुसरा कसोटी क्रिकेट सामना निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.
जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स मैदानावर सुरू असेल्या या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने ४० षटकांत २ बाद ११८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने एडिन मार्करमला (३१), तर रविचंद्रन अश्विनने कीगन पीटरसनला (२८) पायचीत पकडले. कर्णधार डीन एल्गर (खेळत आहे ४६) मात्र एक बाजूने तग धरून असून त्याच्या साथीला रॅसी व्हॅन दर दुसेन ११ धावांवर खेळत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असूून आफ्रिका उर्वरित १२२ धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ बळी गारद करून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणे रंजक ठरेल.