महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । जगभरात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशातही कोरोनाची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 16 हजार 390 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. भारतात मागील 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3 लाख 64 हजार 848 झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. केवळ या तीन राज्यांमध्ये 60 टक्के नवे कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे.
नव्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक 36 हजार 265 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 15 हजार 421, दिल्लीमध्ये 15 हजार 97, तमिळनाडूत 6 हडार 983 तर केरळात 4 हजार 649 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे 3,52,25,693 रुग्णांची नोंद झाली आहे.
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढताना दिसत आहे. आता देशात या व्हेरियंटनं दुसरा मृत्यू झाला आहे. ओदिशातील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमायक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 73 वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.