महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ जानेवारी । कोरोनाची तिसऱ्या लाटेत मंत्री, आमदारांपाठोपाठ आता मंत्र्यांच्या कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झालाय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी कोरोनाबाधित आढळलेत, तर छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील 22 जणांना कोरोनाची बाधा झालीय. याशिवाय वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा विळखा आणखी मजबूत होत चालला आहे. सकाळी त्यांच्या कार्यालयात चार जणांना कोरोना झाल्याची माहिती आली होती मात्र आता ही संख्या वाढून तब्बल 21 वर पोहोचली आहे. तसंच आणखी 15 जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. वळसे-पाटील यांच्या सचिवालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. स्वतः दिलीप वळसे पाटील हे मात्र या कर्मचाऱ्यांच्याा संपर्कात आले आहेत का याची माहिती अद्याप मिळालेली नाही.