महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना आता 14 दिवसांऐवजी केवळ 7 दिवस त्यांच्या घरी आयसोलेट किंवा क्वारंटाइन राहावे लागेल. इतकेच नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण देखील 94% वरून 93% करण्यात आले आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, ज्या दिवशी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्या दिवसापासून 7 दिवसांच्या आयसोलेशन कालावधीची सुरुवात मानली जाईल. जर रुग्णाला आयसोलेशनदरम्यान सलग 3 दिवस ताप आला नाही तर आठव्या दिवसापासून तो कोरोना निगेटिव्ह मानला जाईल. यासाठी कोरोना तपासणीचीही गरज भासणार नाही.
देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी दररोज येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली. एका अंदाजानुसार, यापैकी सुमारे 60% रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉनच्या बहुतेक रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसतात, परंतु डेल्टा प्रकाराच्या तुलनेत तो 30 पट वेगाने पसरतो.
लक्षणे नसलेला रुग्ण कोणाला मानले जाईल?
लक्षणे नसलेला रुग्ण म्हणजे ज्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे, परंतु त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्याच वेळी, खोलीच्या सामान्य हवेमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन 93% पेक्षा जास्त आहे. पूर्वी ऑक्सिजन सॅच्युरेशनचे हे प्रमाण 94% होते.
सौम्य लक्षणे असलेले रुग्ण कोण असतील?
ज्यांना तापासह किंवा तापाशिवाय अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्टशी संबंधित लक्षणे आहेत. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. याशिवाय, रुग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन 93% पेक्षा जास्त आहे, अशांना सौम्य लक्षण असलेले रुग्ण समजले जाईल.
रुग्णांना घरी कसे आयसोलेट केले जाईल?
जर डॉक्टरांनी लेखी स्वरुपात सांगितले की, रुग्णात लक्षणे नाहीत किंवा असल्यास सौम्य आहेत, तर अशा रुग्णांना होम आयसोलेट केले जाईल.
ज्यांच्या घरी रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबाला क्वारंटाइन ठेवण्याची व्यवस्था आहे अशा लोकांना घरी आयसोलेट केले जाईल,
रुग्णाची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती 24 तास तिथे असणे आवश्यक आहे. रुग्णाचा आयसोलेशनचा काळ संपेपर्यंत देखभाल करणारी व्यक्ती आणि डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात राहतील. नियंत्रण कक्षाचा क्रमांक कुटुंबाकडे राहील आणि आयसोलेट झालेल्या रुग्णाला वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.