महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । कोरोनाच्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन लागल्यानंतर मोठ्या शहरांमधून घरी परतणाऱ्या स्थलांतरितांचे हृदयपिळवटून टाकणारे फोटोज आपण सर्वांनी पाहिले आहेत. महामारीच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळत आहे. मुंबईत लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजुरांनी रेल्वे स्थानकावर तळ ठोकला आहे. लॉकडाऊनच्या आधी आपापल्या गावात आणि घरापर्यंत पोहोचायला हवे असा सर्वांचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे, आरोग्य मंत्री किंवा राज्य सरकारने पूर्ण लॉकडाउन लागणार नाही हे आधीच स्पष्ट केले. परिस्थिती बिघडली तरीही केवळ गर्दी कमी केली जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. तरीही परराज्यांतील आलेल्या या मजुरांना 2020 सारख्या परिस्थितीची भीती वाटत आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांच्या दरम्यान 29 हजारांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. अशा वेळी पूर्णतः लॉकडाऊनच्या चर्चांमुळे प्रवासी आणि विशेषतः मजूर खूप घाबरलेले आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच मुंबईच्या लोकमान्य टिळक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होती. तिसऱ्या लाटेच्या भितीने आपापल्या घरी परतण्यासाठी लोक कसे प्रयत्न करत आहेत.