पुण्यासह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा ; पुढील 3 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ जानेवारी । उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील तीन दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार (heavy rainfall with thunderstorm) पाऊस कोसळणार आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची (hailstorm alert in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत.

हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज राज्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली असून पुढील काही तासांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि गोंदिया या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवली आहे. याशिवाय पुण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या बारा जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

 

उद्या आणि परवा राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. उद्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मंगळवार देखील कमी अधिक प्रमाणत हीच स्थिती कायम राहणार आहे.

सध्या उत्तर भरतात पश्चिमी वाऱ्याचा विक्षोभ सुरू आहे. त्यामुळे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण होत आहे. पुढील 4 ते 5 दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. याशिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव म्हणून 9 ते 13 जानेवारी दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस कोसळणार आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भात विजांच्या कडकडाटासह, वादळी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *