कोणाच्या बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही; शिवसेना खासदार संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.यावेळी त्यांनी आमदारांची फोडाफोडी करणाऱ्या भाजप नेत्यांना फैलावर घेतले ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत:हून राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्रात असे काहीही घडणार नाही. कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, असे राऊत यांनी सांगितले.

तसेच कोरोनाच्या संकटावेळी राजकारण करू पाहणाऱ्या भाजप नेत्यांनाही राऊत यांनी फटकारले. कोरोनावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना म्हाळगी प्रबोधिनीमध्ये क्वारंटाईन करावे, असा टोला त्यांनी लगावला. कोरोनासारख्या संकटाच्या काळात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवेत, असे आम्ही देखील म्हणतो. ही राजकारण करण्याची वेळ नाही. महाराष्ट्रात मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे. मात्र, भाजपला राजकारणच करायचे असेल तर त्यांना विरोधी पक्षातही बसण्याचा अधिकार नाही, असे राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *