पंतचे शतक, भारताला मालिका विजयासाठी हवा एक चांगला स्पेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । फलंदाज ऋषभ पंत याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नाबाद १०० धावा केल्या. मात्र यानंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावातील नाममात्र १३ धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने यजमानांना विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले. यानंतर द. आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेर २९.४ षटकांत २ बाद १०१ धावांची भक्कम वाटचाल केली.

पंतने तब्बल १४ डावानंतर चौथे शतक ठोकले. द. आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकणारा तो आशियातील पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला. दिवसाच्या सुरुवातीला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे लवकर बाद झाले. कर्णधार विराट कोहलीने (२९) पंतसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उपाहारानंतर विराट एनगिडीच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर रविचंद्रन अश्विन व शार्दुल ठाकूर यांना एनगिडीने बाद केले. पंतने एकाकी चिवट झुंज दिली. यानंतर कीगन पीटरसन (४८*) व कर्णधार डीन एल्गर (३०) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारी करत द. आफ्रिकेला भक्कम स्थितीत आणले. यजमानांना विजयासाठी अद्याप १११ धावांची गरज असून दोन दिवस शिल्लक आहेत.

ऋषभ पंतने चौथे कसोटी शतक झळकावले. यासह पंत सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारा महेंद्रसिंग धोनीनंतरचा (६) दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला. रिद्धिमान साहा (३) तिसऱ्या स्थानी.ऋषभ पंत विदेशात सर्वाधिक ३ शतके ठोकणारा भारतीय यष्टिरक्षक ठरला. महेंद्रसिंग धोनी, विजय मांजरेकर, अजय रात्रा आणि रिद्धिमान साहा यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा भारतीय यष्टिरक्षक ठरला. त्याने महेंद्रसिंग धोनीचा २०१० सालचा ९० धावांचा विक्रम मोडला

दुसऱ्या डावात पुजारा ९ धावांवर येनसनचा बळी ठरला. लेग गलीमध्ये किगन पीटरसन याने पुजाराचा फारच अप्रतीम झेल टिपला. पुढच्या षटकात अजिंक्य १ धाव काढून माघारी परतला.

ऋषभचे दिग्गजांकडून कौतुक
ऋषभने १४ डावानंतर कसोटी शतक ठोकले. याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात ११८ चेंडूत १०१ धावा काढल्या होत्या. त्याच्या या खेळीची दिग्गजांनी प्रशंसा केली. विरेंद्र सेहवागने त्याला ‘अतुल्य शंभर गुणांचे प्रतिक’ असे संबोधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *