महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंतच्या सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना विषाणूला वेशीवरच रोखून धरले आहे. या सर्व गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. खऱ्या अर्थाने ही गावे कोरोनामुक्तीत पुणे जिल्ह्यात यशवंत ठरली आहे. यामध्ये भोर तालुक्यातील सर्वाधिक १७ गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील एकमेव गावाने यात स्थान पटकावले आहे.
राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० मार्चला जिल्ह्याच्या ग्रामीण ग्रामीण भागातील पहिला कोरोना रुग्ण नोंदला गेला होता.
तेव्हापासून आजअखेरपर्यंत (ता.१३ जानेवारी २०२२) या गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. एकही रुग्ण न सापडलेल्यांमध्ये आंबेगाव, भोर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या पाच तालुक्यांतील गावांचा समावेश असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (ता.१३) सांगितले.
कोरोनाला वेशीवर रोखण्यात यशवंत ठरलेली तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे ः मेघोली, म्हाळुंगे, कुसरिक, अगाणे, वर्सावणे, आपटी, कोलतावडे (सर्व ता. आंबेगाव), कुडापणेवाडी, वाव्हेघर, शिवनागरी, पऱ्हार खुर्द, पऱ्हार बुद्रूक, माझेरी, धानवली, कुडली खुर्द, हिर्डोशी, वारवंड, अभिपुरी, शिळींब, डेरे, बांद्रावली, खुलाशी, बोपे, डेहाण (सर्व ता. भोर), कोहिंडे खुर्द, खारवली, तोरणे खुर्द, आढे, येणवे खुर्द, पारासूळ, खरपूड, माजगाव, वेल्हावळे, माळवाडी-ठाकरवाडी (सर्व ता. खेड), बहिरवाडी (ता.पुरंदर), गिवशी, गोडेखल, घोळ, हरपूड, कोशिमघर, खरीव, मेटपिलावरे, टेकपोळे आणि वडघर.