महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील राजीनामा सत्र थांबलेले नाही. योगी सरकारमधील आयुष राज्यमंत्री धर्मपालसिंह सैनी यांनी गुरुवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पाठोपाठ शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा यांनीही राजीनामा दिला असून, तीन दिवसांमध्ये तीन मंत्री आणि पाच आमदार असे आठ ओबीसी नेते भाजपमधून बाहेर पडले आहेत. या सर्व नेत्यांनी समाजवादी पक्षाची वाट धरली असून, आणखी किमान दोन आमदारांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जात आह़े.
उत्तर प्रदेशात भाजपचा प्रमुख मतदार असलेल्या बिगरयादव ओबीसी समाजातील नेत्यांना ‘सप’मध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने प्रयत्न केले होते. तरीही धर्मपालसिंह सैनी यांनी राजीनामा दिल्याने भाजपमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात गेले दोन दिवस विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांतील उमेदवारांच्या निवडीवर खल केला जात असताना मंत्र्यांच्या राजीनाम्यांमुळे भाजपच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे. या पडझडीला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे भाजप आघाडीतील ‘निशाद पक्षा’चे प्रमुख संजय निशाद व ‘अपना दला’च्या (सोनेलाल) नेत्या व केंद्रातील राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या दोघांशीही बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी चर्चा केली. ‘निशाद पक्ष’ व ‘अपना दल’ या दोन्ही पक्षांना जागावाटपात अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. पाच वर्षे सत्ता भोगल्यानंतर भाजपवर आरोप करत हे नेते राजीनामा देत असल्याची तीव्र टीका संजय निशाद यांनी ‘राजीनामा सत्र’ सुरू करणारे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर केली.
भाजपच्या केंद्रीय निवड समितीने उत्तर प्रदेशातील १७२ उमेदवारांची यादी तयार केली असून, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरचित्रसंवादाद्वारे बैठक घेण्यात आली. मंत्री व आमदारांच्या राजीनाम्यांमुळे फारसा फरक पडत नाही, २०१७ पेक्षाही जास्त जागा जिंकून भाजप सत्तेवर येईल, असा दावा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बैठकीनंतर केला. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी संक्रांतीनंतर १५ वा १६ जानेवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील बदललेल्या वातावरणामुळे वजनदार नेत्यांना उमेदवारीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचीही उमेदवारी निश्चित झाली आहे. योगी आदित्यनाथ अयोध्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असली, तरी केशव मौर्य यांचा मतदारसंघ अजून निश्चित झालेला नाही. योगी आणि मौर्य हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य असून, त्यांनी २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती.