‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ चित्रपटासाठी महेश मांजरेकरांना मनसेचा पाठिंबा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । अभिनेते महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीत आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आहेत. त्यांचे दिग्दर्शन असलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. दरम्यान, आता महेश मांजरेकरांच्या समर्थनाथ महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर पुढे आले आहेत.

अमेय खोपकर यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत मांजरेकरांना पाठिंबा दिला आहे. ही पोस्ट शेअर करत ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्यात महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा मी अग्रक्रमाने निषेध करतो. महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाबद्दल जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा. पूर्वग्रहदूषित ‘सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो, आपला मेंदू किती सडलेला आहे हेच तुम्ही जगाला ओरडून सांगताय. मी चित्रपट बघून लवकरच पुन्हा बोलेनच, असे अमेय म्हणाले. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *