पुणेकरांनो मदत करा, 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण, आ. महेश लांडगेंकडून अपहरणकर्त्याचे फोटो जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ जानेवारी । भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी पुण्यातील एका अपहरण झालेल्या मुलाच्या शोधासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत. पुण्यातील बालेवाडी (Balewadi) हाय स्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) (दुग्गू) याचं अपहऱण करण्यात आलं होतं. ही घटना 11 जानेवारी रोजी घडली होती. मुलाच्या वडिलांना देखील यासंदर्भात सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. स्वर्णव चव्हाण याचे वडील सतिश चव्हाण यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार तो अद्याप कुटुंबीयांना परत मिळालेला नाही. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीनं एक पोस्टर प्रकाशित करण्यात आलं असून स्वर्णव चव्हाण याच्या संदर्भात माहिती मिळाल्यास ती शेअर करावी, असं देखील त्यांनी त्या पोस्टर मध्ये म्हटलं आहे. महेश लांडगे यांनी दोन फोटो जारी केले असून संबंधित गाडी चालवणारी व्यक्ती कुठं आढळून आल्यास संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महेश लांडगे यांचं नेमकं आवाहन काय?
भाजप आमदार महेश लांडगे यांनी एक फोटो जारी केला आहे. त्यामध्ये अपहरण झालेल्या मुलाचा फोटो आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळणाऱ्या दुचाकीचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. स्वर्णव चव्हाण या मुलाचं काळ्या रंगाच्या अ‌ॅक्टिव्हा चालवणाऱ्या व्यक्तीनं अपहरण केल्याचा संशय आहे. संबंधित गाडीवरील क्रमांक 8531 असून इतर अक्षरं दिसत नाहीत किंवा तो फोटो खोटा असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं संबंधित व्यक्ती किंवा मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास आमदार महेश लांडगे यांच्याकडे किंवा मुलाच्या कुटुंबीयाकंडे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

स्वर्णव चव्हाणचं वर्णन
सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव चव्हाण याचं वय 4 वर्षं असून उंची 3 फुट आहे. बांधा सडपातळ असून केस काळ्या आणि सोनेरी रंगाचे आहेत. अपहरण झालं त्यावेळी त्यानं निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो. नागरिकांना अपहरणकर्ता किंवा स्वर्णव चव्हाण यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास ती पोलीस किंवा चव्हाण कुटुंबीयांकडे द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *