UP Election 2022 योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढवणार, भाजपची पहिली यादी प्रसिद्ध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ जानेवारी । भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी शनिवारी प्रसिद्ध केली. पहिल्या यादीमध्ये योगी आदित्यनाथ यांचेही नाव असून ते गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी धर्मेंद्र यादव यांनी शनिवारी एक पत्रकार परिषद घेत, पहिली यादी प्रसिद्ध केली. पहिल्या यादीत 107 उमेदवारांची नावे आहेत.

मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवून दाखवा! राकेश टिकैत यांचे योगी आदित्यनाथ यांना आव्हान

पहिल्या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे, त्यातील 58 पैकी 57 जागांवरील उमेदवारांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे त्यातल्या 55 पैकी 48 जागांवरील उमेदवारांची नावेही शनिवारी जाहीर करण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचेही नाव पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून ते सिराथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने पहिल्या यादीत 20 आमदारांची तिकीटे कापली आहेत. बुलंदशहरमधील 7 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघातील आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. भाजपने 68 टक्के तिकीटे ही मागासवर्गीय समाजातील उमेदवारांना दिली असल्याचं म्हटलं आहे. पहिल्या यादीत 44 ओबीसी उमेदवारांना, 19 अनसुचित जातीच्या उमेदवारांना आणि 10 महिलांना उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.

भाजपने योगींना घरी पाठवलंय, घरी गेल्याबद्दल शुभेच्छा!

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केल्यानंतर योगी आदित्यनाथ आणि भाजपवर टीका केली आहे. योगी आदित्यनाथ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावरून बराच सस्पेंस निर्माण झाला होता. अयोध्या, मथुरा, प्रयागराज, देवबंद अशा वेगवेगळ्या मतदारसंघांची नावे पुढे केली जात होती. प्रत्यक्षात योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून निवडणूक लढवताना दिसतील. यावरून त्यांना टोमणा मारताना अखिलेश यांनी म्हटले की ‘मला आनंद आहे की भाजपने त्यांना घरी पाठवलं. मला वाटतं की आता त्यांना घरीच रहावं लागेल. घरी गेल्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा’ अखिलेश यांनी दावा केला आहे की गोरखपूरमधील सगळ्या जागा समाजवादी पक्षच जिंकेल. इतर पक्षातून होत असलेल्या इनकमिंगबाबत बोलताना अखिलेश म्हणाले की आता समाजवादी पक्षात भाजप असो वा इतर कोणताही पक्षातून येणाऱ्या नेत्याला घेतलं जाणार नाही. आमच्या पक्षाने बऱ्याच जागांचा त्याग करून इतर पक्षांना आमच्यासोबत जोडून घेतलं आहे, यापुढे आम्ही अजून त्याग करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *