महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ जानेवारी । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला आहे. कोरोना लॉकडाउनमध्ये मद्य पार्टी केल्याने ते वादात सापडले आहेत. याप्रकरणी संसदेत माफी मागितल्यावरही त्यांच्यावरील राजीनाम्यासाठीचा दबाव वाढला आहे. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या 10 पैकी 6 मतदारांनी जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीला चुकीचे ठरविले आहे. जॉन्सन यांची लोकप्रियता कमी होत 36 टक्के राहिली आहे. याचदरम्यान भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती म्हणून समोर आले आहेत.
सत्तारुढ कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या यूगॉव पोल सर्वेमध्ये 46 टक्के लोकांनी सुनक हे जॉन्सन यांच्यापेक्षा सरस पंतप्रधान ठरू शकतात असे मत व्यक्त केले आहे. सुनक पंतप्रधान झाल्यास मे 2024 मध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला अधिक जागा मिळू शकतात असेही सर्वेक्षणात दिसून आले आहे. जॉन्सन यांच्याकडून लॉकडाउन पार्टीची बाब कबूल करण्यात आल्यावर ब्रिटनचे आरोग्य सचिव जोनाथन टॅम यांनी गुरुवारी राजीनामा दिला आहे.
जॉन्सन अडचणीत
जॉन्सन यांच्या लोकप्रियतेत सर्वात मोठी घसरण झाली आहे. जुलै 2020 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जॉन्सन यांना स्वतःच्या पक्षाच्या 85 टक्के मतदारांचे समर्थन प्राप्त होते. परंतु अलिकडच्या सर्वेक्षणात एक तृतीयांश मतदारांनी जॉन्सन यांनी पद सोडावे असे म्हटले आहे. यूगॉव पोलच्या गुरुवारी समोर आलेल्या निष्कर्षांमध्ये ब्ा्रिटनमधील विरोधी पक्ष लेबर पार्टीला कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या तुलनेत 10 टक्क्यांची आघाडी प्राप्त झाली आहे. कॉन्झर्व्हेटिव्हला 28 तर लेबर पार्टीला 38 टक्के समर्थन प्राप्त झाले आहे. लेबर पार्टीला 2013 नंतर प्राप्त झालेले हे सर्वाधिक समर्थन आहे.
नारायण मूर्ती यांचे जावई
1980 मध्ये ऋषी सुनक यांचा हॅपशर येथील साउथॅम्पटन येथे जन्म झाला होता. ते नॉर्दलर्टन शहराच्या कर्बी सिग्स्टन भागात वास्तव्याला आहेत. त्यांचे आईवडिल हे मूळचे पंजाबमधील आहेत. वडिल डॉक्टर आणि आई फार्मासिस्ट होत्या. पूर्व आफ्रिकेतून 1960 च्या दशकात ते इंग्लंडमध्ये पोहोचले होते. तर ऋषी सुनक हे इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी यांच्या पत्नी अक्षता मूर्ती असून या दोघांना दोन मुली आहेत. बँकर म्हणून कारकीर्द सुरू करणाऱया सुनक यांनी 2015 मध्ये पहिली निवडणूक जिंकली होती. थेरेसा मे सरकारमध्ये संसदीय सचिव राहिलेले ऋषी हे बेक्झिट समर्थक राहिले आहेत. उत्तर यॉर्कशारमधील रिचमंडसाठी ते संसदेचे सदस्य राहिले आहेत.
दुसऱया दावेदारही भारतीय वंशाच्या
ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल देखील बोरिस यांच्या राजीनाम्याच्या स्थितीत पंतप्रधानपदाच्या दावेदार ठरू शकतात. पटेल यांचा स्थलांतरितांना आश्रय देण्यास विरोध राहिला आहे. ब्रिटिश राजकीय नेत्या म्हणून त्या 2019 पासून गृह सचिव म्हणून काम करत आहेत. 2016-17 या कालावधीत त्या आंतरराष्ट्रीय विकास राज्य सचिव होत्या. पटेल या 2010 पासून विथम मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत.